चेन्नई - तामिळनाडूत २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि एआयएडीएमके यांच्यात आघाडी झाल्यास आक्रमक नेते के अन्नामलाई यांना तामिळनाडूभाजपाचं अध्यक्षपद सोडावं लागू शकते. अन्नामलाई युवा आक्रमक नेते म्हणून उदयास आले ज्यांचं जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. मागील २ वर्षापासून अन्नामलाई थेट डिएमकेला आव्हान देत आहेत. त्यांच्या धोरणामुळेच २०२३ साली एआयएडिमके यांनी भाजपाशी नाते तोडले होते.
रिपोर्टनुसार, के. अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून निरोप देणे शिक्षा नाही तर तामिळनाडूतील जातीय समीकरण हे कारण आहे. अन्नामलाई यांना दिल्लीत अमित शाह यांनी घेतलेला निर्णय कळवला. त्यानंतर पक्षाच्या निर्णयाचं स्वागत करत पक्षवाढीसाठी काम करत राहणार असं अन्नामलाई यांनी म्हटलं. तामिळनाडूमध्ये भाजपा आणि एआयएडिएमके यांच्यातील निवडणूक आघाडीची शक्यता पाहता राजकीय हालचालींना वेग आला आहे. जर २०२६ मध्ये भाजपा-एआयएडिएमके यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते अन्नामलाई आणि पलानीस्वामी हे एकाच गोंडर समुदायातून येतात. दोन्ही नेते पश्चिमी कोंगु भागातून येतात जिथे गोंडर जातीचं वर्चस्व आहे.
या स्थितीत राज्यातील दुसरी मोठी जात थेवर समाजातील व्यक्तीकडे पक्षाचं नेतृत्व सोपवले जाऊ शकते. जर ते झाले तर तामिळनाडूत भाजपाचा चेहरा बनलेले अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागेल. अन्नामलाई तामिळनाडूत आक्रमक युवा नेते म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. मागील काळात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्लीत अन्नामलाई यांच्यासोबत दीर्घ चर्चा केली. तुमच्या भविष्याबाबत पक्ष कटिबद्ध आहे असं त्यांनी अन्नामलाई यांना आश्वासन दिले. पक्षातील नेतृत्व बदलानंतरही तामिळनाडूच्या राजकारणात अन्नामलाई यांची महत्त्वाची भूमिका राहील. अन्नामलाई यांनीही पक्षासोबत निष्ठा दाखवत कार्यकर्ता म्हणूनही काम करण्याची तयारी दाखवली आहे.
दरम्यान, भाजपा आमदार नैनार नागेंद्रन यांना तामिळनाडू भाजपाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकते. हे थेवर समुदायातून येतात. नैनार नागेंद्रन तिरूनेलवेली येथील लोकप्रिय नेते आहेत. ते याआधी एआयएडिएमकेमध्ये होते. जयललिता यांच्या कार्यकाळात थेवर समुदायाचे मतदान एआयएडिएमकेची व्होटबँक मानले जायचे. दक्षिण तामिळनाडूत थेवर समाजाची मते निर्णायक आहेत. नागेंद्रन यांना प्रदेशाध्यक्षपद सोपवले तर दक्षिण भागात भाजपाला पक्षसंघटन वाढवण्यास मदत होईल असं वरिष्ठांना वाटते.
भाजपाला यश कसं मिळणार?
भाजपा सध्या तामिळनाडूत एआयएडिएमकेहून अधिक मजबूत पक्ष बनला आहे. २३४ विधानसभा मतदारसंघापैकी ११४ जागांवर भाजपाची पकड आहे. पश्चिम तामिळनाडूत ५४, दक्षिण तामिळनाडूत ६० जागांवर भाजपाचा प्रभाव आहे. एआयएडिएमके पश्चिम तामिळनाडूत भाजपाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. १५० जागा निवडून आणण्यासाठी पक्षाला राज्यातील तिन्ही भागात क्लीन स्वीप करावे लागेल असं अन्नामलाई यांनी म्हटलं. त्याशिवाय मी सत्तेसाठी राजकारणात आलो नाही तर तामिळनाडूचं राजकारण बदलण्यासाठी आलोय असंही अन्नामलाई यांनी स्पष्ट केले.