बर्मिंगहॅम : यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेचा अखेरचा दिवस सुवर्णमय ठरवताना भारतीयांनी चार सुवर्णपदके पटकावली. पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन व सात्विक साईराज-चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनमध्ये, अचंता शरथ कमल याने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावून दिले. त्याचप्रमाणे, पुरुष हॉकी संघाने रौप्य, तर जी. साथियानने टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक पटकावले.
गर्व से कहो ‘सिंधू’ है
पी. व्ही. सिंधू हिने अखेर आपली स्वप्नपूर्ती करताना राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीचे सुवर्ण पटकावलेच. २०१४ साली कांस्य, तर २०१८ साली रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्यानंतर सिंधूने यंदा पूर्ण ताकद लावत राष्ट्रकुल सुवर्णपदकावर नाव कोरले.
सेनचेही सुवर्ण ‘लक्ष्य’
युवा शटलर लक्ष्य सेन यानेही आपल्या पदार्पणाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकावले आहे.
पुरुष दुहेरीत फडकला तिरंगा
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी बॅडमिंटनमध्ये भारताला तिसरे सुवर्ण मिळवून देताना पुरुष दुहेरी अंतिम सामन्यात इंग्लंडच्या बेन लेन-सीन मेंडी यांचा २१-१५, २१-१३ असा धुव्वा उडवला.
टेटेमध्येही ‘गोल्ड’
टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या लियाम पिचफोर्ड याचा ४-१ असा पराभव करत यंदा शरथचे हे तिसरे सुवर्ण ठरले.
पुरुष हॉकीत निराशा
भारताच्या पुरुष हॉकी संघाला एकतर्फी पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारतीयांना कोणतीही संधी न देता ७-० असे सहज नमवले.