काही वर्षांपूर्वी कोकणातील एका प्रतिष्ठित माजी खासदारांनी आपल्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगून लोकसभेची निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शविली होती. तसाच प्रकार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत घडला आहे. सीतारमन यांनी भाजपाचा लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.
यामागचे कारण देत त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी तशाप्रकारचा पैसा नसल्याचे म्हटले आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना कर्नाटक सोडून आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढविण्याचा पर्याय दिला होता. यावर आठवडाभर विचार केल्यानंतर त्यांनी भाजपाला हा नकार कळविला आहे.
जिंकण्यासाठी वेगवेगळ्या मानदंडांचाही प्रश्न होता. तुम्ही या समाजाच्या आहात की त्या धर्माच्या आहात, मी म्हटले नाही. मला वाटत नाही मी हे करण्यासाठी सक्षम असेल, असे निर्मला यांनी एका कार्यक्रमात सांगितले. माझा नकार त्यांनी स्वीकार केला, या बाबत मी त्यांची आभारी आहे. यामुळे मी निवडणूक लढवत नाहीय असे त्या म्हणाल्या.
देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढण्यासाठी फंड का नाहीय, असे त्यांना विचारले असता त्यांनी भारताचा पैसा हा माझा वैयक्तिक पैसा नाहीय. माझा पगार, माझी कमाई आणि मी केलेली बचत ही माझी आहे. देशाचा साठवलेला पैसा नाही, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. भलेही मी निवडणूक लढविणार नसेन परंतु उमेदवारांचा प्रचार करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. निर्मला सीतारामन या कर्नाटकमधून राज्यसभा खासदार आहेत.