नवी दिल्ली - मुली या मुलांपेक्षा कमी नाहीत. मुलींनी ठरवलं तर जिद्दीने त्या सर्व काही करू शकतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण नोकरी मिळाली नाही. तरुणीने परिस्थिती समोर हार न मानता आता थेट ई-रिक्षा चालवण्याचा वेगळा मार्ग स्वीकारला. ई-रिक्षा चालवून ती कुटुंबाचं पोट भरते आहे. रेश्मा द्विवेदी असं या 19 वर्षीय कष्टकरी मुलीचं नाव आहे. वडिलांच्या कमाईवर कुटुंब चालवणे कठीण होत होतं.
मुलीने कुटुंबाला आणि वडिलांना हातभार लावण्यासाठी नोकरी करण्याचा विचार केला. रेश्माने नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण अनेक प्रयत्नांनंतरही तिला नोकरी मिळाली नाही. नोकरी न मिळाल्याने मुलीने हिंमत न हारता ई-रिक्षाचा आधार घेतला. आता ती रोज एवढी कमावते की ज्याच्यावर तिचं घर आरामात चालतं. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या रीवा नगर येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय रेश्मा द्विवेदीने नोकरी न मिळाल्याने स्वत:वर विश्वास ठेवला आणि ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.
रेश्माने दिलेल्या माहितीनुसार, 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी तिच्या वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे ती पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही. नोकरी शोधताना अनेक अडचणी आल्या पण नोकरी काही मिळाली नाही. मग मी ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि कशी तरी ई-रिक्षासाठी आर्थिक मदत मिळवली. आता हप्ता भरल्यानंतर मी दररोज इतके कमावते की मी माझ्या वडिलांना कुटुंब चालवण्यासाठी आर्थिक मदत करू शकते.
रेश्मा द्विवेदीने सांगितलं की, त्यांच्या घरात फक्त वडील कमावतात पण घर व्यवस्थित चालवण्याइतके उत्पन्न त्यांना मिळत नाही. वडिलांच्या कमाईने घर चालवणं थोडं कठीण होतं. त्यांचा त्रास कमी करण्यासाठी रेश्माने पुढचा अभ्यास न करता काम करण्याचा निर्णय घेतला. रेश्मा बेरोजगार तरुणांना सांगते की, चोरी करणे आणि भीक मागणे यापेक्षा कष्ट करून कमावणं कधीही चांगलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.