नवी दिल्ली - आता भारतातील रस्त्यांवर लवकरच हायड्रोजन कार धावताना दिसणार आहेत. देशातील बहुप्रतीक्षित पहिल्या हायड्रोजन कारने आपला प्रवास सुरू केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज यामधून प्रवास केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कारमध्ये बसून, आज संसदेमध्ये पोहोचले. यादरम्यान, स्वच्छ इंधनावर चालणारी ही कार लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. ही कार टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आली आहे. तसेच यामध्ये अॅडव्हान्स फ्युएल सेल लावण्यात आले आहेत. हे अॅडव्हान्स सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणातून वीज तयार करते. या विजेवरच ही कार चालते. उत्सर्जनाच्या रूपात या कारमधून केवळ पाणी बाहेर येते.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, ही कार पूर्णपणे पर्यावरणपुरक आहे. त्यामधून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. त्यांनी सांगितले की, ही कार भारताचे भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या कारमुळे मोट्या प्रमाणात प्रदूषण पसरते. मात्र हायड्रो फ्युएल सेल कारमधून अजिबात प्रदूषण होत नाही.