काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील जंगलांना लागलेल्या भीषण आगीने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आज उत्तराखंडमधील घनदाट जंगलांना वणवा लागला आहे. यामध्ये सुमारे १८०० एकर जमिनीवरील वनसंपदा जळून खाक झाली असून जंगली प्राणी जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले आहेत.
जंगलांना आग लागण्याची व्याप्ती थोड्या थोडक्या नव्हे तर उत्तराखंडच्या ११ जिल्ह्यांपर्यंत वाढली आहे. जवळपास ३५ वणवा लागल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. गढवाल मंडळातील पौडी, रुद्रप्रयाग, चमोली, उत्तरकाशी, टिहरी, डेहराडून आणि कुमाऊ मंडळात नैनीताल, बागेश्वर, अल्मोड़ा, पिथौरागढ़ व चंपावत हे जिल्हे प्रभावित झाले आहेत.
तर नैनितालच्या भीमतालला लागून असलेल्या घनदाट जंगलाला गेल्या ४ दिवसांपासून भीषण वणवा लागला आहे. जिल्हा प्रशासन हतबल झाले असून ही आग नैनिताल हायकोर्ट कॉलनी, लष्कराच्या छावणीपर्यंत येऊन ठेपली आहे. यामुळे आता लष्कराला आग विझविण्यासाठी उतरवावे लागले आहे.
नैनितालच्या तलावामध्ये बोटिंगवर बंदी आणण्यात आली आहे. आर्मीने आग विझविण्याचे काम हाती घेतले असून हेलिकॉप्टरद्वारे केमिकलची फवारणी करून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आयटीआय बिल्डिंगलाही आगीची झळ बसली आहे.