नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यापासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजची आकडेवारी जाहीर केली आहे. यात गेल्या २४ तासांत देशात १९४६ नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या XBB व्हेरियंटचे १८ रुग्ण आढळले आहेत.सध्या त्या ठिकाणी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 चे रुग्णही देशात सापडले आहेत. दिल्ली एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी ओमिक्रॉनच्या वेगाने पसरणाऱ्या व्हेरियंट संदर्भात इशारा दिला आहे.
Diwali Health Tips : बदलत्या हवेचा त्रास, फटाक्यांच्या धुराची ॲलर्जी असेल तर आत्ताच करा ३ उपाय
“कोरोनाच्या या वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घ्यायला हवी. याआधी बहुतेक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे, असं दिल्ली एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले.
"या विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर केला पाहिजे. त्यामुळे वृद्धांमध्ये आणि कोणत्याही आजाराचा धोका असलेल्या लोकांमध्ये विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येईल. जर तुम्ही बाहेर जात असाल आणि विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, तर तुम्ही मास्क वापरणे आवश्यक आहे. ज्या लोकांना कोणत्याही आजाराचा धोका आहे आणि वृद्ध लोकांनी बाहेर जाणे टाळावे कारण गर्दीच्या ठिकाणी संसर्ग पसरण्याची शक्यता असते, असंही एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले.