'गांधी घराण्याने पद सोडावं अन् दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी'; काँग्रेसच्या नेत्याचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:09 PM2022-03-15T12:09:28+5:302022-03-15T13:40:26+5:30
पाच राज्यातील निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
नवी दिल्ली : पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील दारूण पराभवाची चिकित्सा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अध्यक्ष असतील, यावर एकमत झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच नेतृत्वाबाबत तक्रार असल्यास पद सोडण्याची तयारी असल्याचे सोनियांनी सूचित केले. परंतु कार्यकारिणीच्या सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्ष मजबुतीसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी ठळकपणे अधोरेखित केले.
पाच राज्यातील निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी महत्वाचं विधान केलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मला आश्चर्य वाटले नाही. गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. तुम्हाला जर पराभवाची कारणे माहीत नसतील, तर तुम्ही कल्पनालोकात जगत असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.
निवडणुकीत पराभवानंतरही काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी पराभव स्वीकार केलेला नाही. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये २०२४ साठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील पराभवावर विचारमंथन केले, परंतु त्यापूर्वी त्यांनी काही तास कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
दरम्यान, पुढील दोन वर्षात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आव्हानांला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा काँग्रेस कार्यकारिणीसह संघटनात्मक फेरबदल करण्याचा बेत आहे. हे फेरबदल एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्यात केले जाऊ शकतात.
लोकसभेच्या दोनशे जागांसाठी काँग्रेस आणि भाजपदरम्यान थेट लढत होणार असेल, तर पंजाब, राजस्थान, छत्तीसगढमधील सत्ता राखणे आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळविणे, हेच काँग्रेसचे प्राधान्य आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार झारखंड, तेलंगणात निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर रणनितीक आघाडीने भाजपला रोखता येईल. २३ नेत्यांच्या समूहाचाही (जी २३) समावेश केला जाऊ शकतो. या भूपिंदर सिंह हुडा वगळता या समूहातील अन्य जनमाणसात प्रभाव असलेले नेते नसले, तरी ते अनुभवी आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी निष्ठावंत आहेत.