संजय शर्मानवी दिल्ली : नवीन संसदेच्या वस्तुसंग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांपासून सम्राट अशोक, कौटिल्य व मगध साम्राज्यापर्यंत भारतातील अनेक महान राज्यकर्त्यांचे चित्रण करण्यात आले आहे. ज्यांच्या राज्य कारभाराचा प्रभाव शतकानुशतके जनमानसावर कायम आहे, अशा थोर राज्यकर्त्यांचे म्युरल्स या संग्रहालयात चितारण्यात आले आहेत.
रामराज्यापासून सम्राट अशोकापर्यंत तसेच मगध साम्राज्यातील कौटिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या धोरणाचा संपूर्ण संग्रहालयात उल्लेख करण्यात आला आहे. संविधान सभेत कशा प्रकारे भारताच्या राज्यघटनेला अंतिम स्वरूप देण्यात आले, याचेही चित्रण करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रतही नवीन संसदेत प्रतिष्ठापित करण्यात आली आहे.
पंतप्रधानांसाठी गजद्वार, मंत्र्यांसाठी मकरद्वारजुन्या संसदेत प्रवेशद्वार क्रमांक पाच पंतप्रधानांसाठी, प्रवेशद्वार क्रमांक चार मंत्र्यांसाठी, प्रवेशद्वार क्रमांक तीन सभापतींसाठी आणि प्रवेशद्वार क्रमांक १३ उपराष्ट्रपतींसाठी राखीव होते. प्रवेशद्वार क्रमांक एक, दोन आणि बारामधून सर्व खासदार आणि मंत्री प्रवेश करत असत. तथापि, नव्या संसदेत पंतप्रधान ज्या प्रवेशद्वारातून संसद भवनात प्रवेश करतील त्या प्रवेशद्वाराला गजद्वार असे नाव देण्यात आले आहे, केंद्रीय मंत्र्यांसाठी मकरद्वार व पत्रकारांना गरुडद्वार आणि हंसद्वार प्रवेशद्वारांद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.
कॉफी रुम असेलनव्या संसदेत मध्यवर्ती सभागृह (सेंट्रल हॉल) नाही; पण दोन ठिकाणी २० ते ३० खासदार बसू शकतील, अशा कॉफी रुम बनवण्यात आल्या आहेत. खासदारांसाठी दोन छोट्या कॅन्टीन बनवण्यात आल्या आहेत. तेथे खासदारांना जेवण तसेच नाष्टा घेता येईल.
नवीन संसद तुलनेने लहान जुन्या संसदेच्या तुलनेत नव्या संसदेचे क्षेत्रफळ खूपच कमी आहे, त्यामुळे केवळ काही केंद्रीय मंत्र्यांना तळमजल्यावर कार्यालये मिळू शकली आहेत, तर उर्वरित केंद्रीय मंत्री आणि राजकीय पक्षांना पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर कार्यालये देण्यात आली आहेत