छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला त्याच्या हट्टीपणामुळे जीव गमवावा लागला. या युवकाने नवस पूर्ण झाल्यावर देवाला बळी म्हणून बकरा अर्पण केला. त्याचा बळी देण्यात आल्यानंतर या तरुणाने बकऱ्याचं मांस नातेवाईकांना दिलं. तर बकऱ्याचं डोकं आपल्याकडे ठेवलं. यादरम्यान, तरुणाने बकऱ्याचं कच्चं मांस खाल्लं. मात्र त्याचदरम्यान या तरुणाचा जीव गेला. बकऱ्याचा डोळा तरुणाच्या श्वसननलिकेत अडकला आणि गुदमरून या तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सूरजपूरमधील मदनपूर गावात राहणाऱ्या बागर साई याने नवस पूर्ण झाल्यावर खोपा धाम येथे बकऱ्याचा बळी दिला. त्यानंतर तो बकऱ्याचं मांस घेऊन घरी पोहोचला. त्याने बकऱ्याचं मांस नातेवाईकांना दिलं. तर डोकं आपल्याकडे ठेवलं. सोबतच्या मित्रांसोबत मद्यपान करण्याचा प्लॅन त्यांनी आखला. ते मद्यपान करण्यासाठी सूरजपूर येथे गेले. मात्र मद्यपान केल्यानंतर जे काही घडलं त्यामुळे मृताच्या मित्रानांही धक्का बसला.
मद्यपान केल्यानंतर तिन्ही मित्रांनी बकऱ्याच्या डोक्याचं मटण करण्याची तयारी सुरू केली. यादरम्यान मृत तरुणाने कच्चं मांस खाण्याचा हट्ट धरला. मित्रांनी त्याला तसं न करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने ऐकलं नाही. त्याने हट्टाने बकऱ्याचा डोळा तोंडात टाकला. मात्र हा डोळा त्याच्या गळ्यात अडकला आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला.
मृताच्या मित्रांनी सांगितले की, मृत बागरच्या गळ्यामध्ये बकऱ्याचा डोळा अडकला. त्यानंतर मित्रांनी त्याला पाणी पिण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. पुढे हा डोळा श्वसननलिकेत अडकला आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडू लागला. मित्रांनी घाई गडबडीत त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.