विजय मिळवला, पण 'या' एका गोष्टीनं वाढविलं टेन्शन, लोकसभेसाठी काँग्रेसला करावे लागणार मोठे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 08:58 AM2023-05-16T08:58:59+5:302023-05-16T09:00:57+5:30
...ही आकडेवारी लक्षात घेता २०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांत २२४ पैकी १३५ जागा काँग्रेसने जिंकून मोठा विजय मिळविला असला तरी त्यातील ४२ जागांवर काँग्रेस उमेदवार किमान १६ ते काही हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता २०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
कर्नाटकमध्ये १३५ पैकी ६९ जागांवर काँग्रेसने ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत या राज्यात २८ पैकी फक्त तीन जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. त्यावेळी भाजपला २० लोकसभा जागांवर ५० टक्क्यांहून अधिक तर अन्य पाच जागांवर ४५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांतही दमदार कामगिरी करेल, असा विश्वास त्या पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना वाटत आहे.
सर्व गटांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान
- ३० वर्षांपासून गौडा समुदायाचा बालेकिल्ला व वोक्कलिगांचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने उत्तम कामगिरी केली आहे. अशा ४२ जागांपैकी काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत. तर अशा सतरा जागांवर भाजपला, तीन जागांवर जेडीएस पक्षाला विजय मिळाला.
- २०१८च्या विधानसभा निवडणुकांत ५ हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने ३० जागांवर उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेस, भाजप, जेडीएस या तीन पक्षांमध्ये अटीतटीची लढत झाली होती.
- आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटक काँग्रेसमधील सर्व गटांना एकत्र आणण्याचे व त्यांच्यातील संघर्ष थांबविण्याचे काम पक्षश्रेष्ठींना करावे लागेल. त्यात यश आले तरच लोकसभेत काँग्रेसला उत्तम यश मिळू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
२०१८ साली २१३ मतांच्या फरकाने जिंकली जागा -
केवळ सोळा मतांच्या आघाडीने भाजपचा उमेदवार जिंकल्याची घटना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत घडली होती. २०१८ साली विधानसभा निवडणुकांत २१३ मतांच्या फरकाने एक उमेदवार विजयी झाला होता. एक हजारहून कमी मतांच्या फरकाने आठ जागांवर उमेदवार विजयी झाले होते.