दिल्लीमध्ये सरकार स्थापन होऊन अवघा एक दिवस झाला असतानाच मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात वाक्युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्ली सरकारला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याची योजना मंजूर करण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. यानंतर आता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर कामही आम्हालाच करू द्या ना. आम्ही जी आश्वासने दिल्लीतील जनतेला दिली आहेत, ती सर्व आश्वासने पूर्ण होतील. आम्ही आमच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्य बैठकीत आयुष्मान योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना लागू करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे."
यावेळी रेखा गुप्ता यांना, महिलांना 2500 रुपये देण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आतिशी यानी केलेल्या विधानासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, "सरकार आमचे आहे, अजेंडा आमचा आहे, तर कामही आम्हालाच करू द्या ना. प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची आवश्यकता नाही. जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी केले."
काय म्हणाल्या होत्या आतिशी? - रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर, माजी मुख्यमंत्री आतिशी पोस्टर करत म्हणाल्या, "कल मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. मात्र, यात महिलांना 2500 रुपये देण्याच्या योजनेसंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. एवढेच नाही तर रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींची गॅरंटी खोटी सिद्ध केली." यावेळी आतिशी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्येच महिलांना 2500 रुपये देण्याची योजना सुरू करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचाही आठवण करून दिली. तसेच, दिल्लीच्या महिलांना २५०० रुपये केव्हापासून मिळणार, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.