नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघावर नव्याने निवडून आलेल्या संजय सिंह आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीला मोठा धक्का देत बरखास्तीचा निर्णय घेतला. क्रीडा मंत्रालयाचा हा निर्णय कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. कारण संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे अत्यंत खास म्हणून ओळखले जातात.
क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती संघ आणि तिच्या नवनिर्वाचित पॅनेलला निलंबित केल्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या बहिणी आणि मुलींसाठी लढलो. आमची लढाई सरकारसोबत नव्हती. ही लढत फक्त खेळाडूंसाठी होती. आता सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. महिला कुस्ती संघटनेच्या अध्यक्ष एका महिलेला बनवायला हवे, असं मतही साक्षी मलिकेने व्यक्त केलं आहे. तसेच क्रीडा मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय भल्यासाठी असल्याचं साक्षी मलिक म्हणाली.
संजय सिंह अध्यक्ष झाल्यानंतर साक्षीने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. पत्रकार परिषदेत रडत रडत टेबलावर शूज ठेवून तिने निवृत्तीची घोषणा केली होती. आज साक्षी मलिकला पत्रकारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का असा प्रश्न विचारला. यावर यासह बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय कुस्ती महासंघावर कोणते पॅनल येईल, त्यानूसार निर्णय घेईन, असं साक्षी मलिकने स्पष्ट केलं.
कोण आहेत संजय सिंह?
संजय सिंह मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ते कुटुंबासह वाराणसीमध्ये राहतात. संजय सिंह दीड दशकांहून अधिक काळापासून कुस्ती संघटनेशी जोडले गेले असून ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. २००८ पासून ते वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय ते कुस्तीगीर संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारीही पार पाडत आहेत. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना पुढे आणण्यात संजयसिंग बबलू यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.