नवी दिल्ली : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक आणि प्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकार शंभर रुपयांचे एक स्मरणीय नाणे जारी करणार आहे. २६ एप्रिल २०२२ रोजी वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाने हे नाणे जारी करण्यासंबंधी राजपत्रित अधिसूचनाही जारी केली आहे. भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीत हे नाणे तयार केले जाणार आहे.
असे असेल नाणे
बिकानेर येथील नाणे संग्राहक आणि अभ्यासक सुधीर लुणावत यांच्या माहितीनुसार, जवाहरलाल दर्डा यांच्या स्मरणार्थ जारी केल्या जाणाऱ्या शंभर रुपयांच्या नाण्याचे वजन एकूण ३५ ग्रॅम असेल आणि त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्ताचे मिश्रण असेल. या नाण्याची गोलाई ४४ मिलिमीटर असेल. सुधीर लुणावत यांच्या माहितीनुसार, नाण्याच्या पृष्ठभागी जवाहरलाल दर्डा यांच्या छायाचित्रावर देवनागरीत ‘श्री. जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी’ असे लिहिलेले असेल. छायाचित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला १९२३ आणि २०२३ असे लिहिलेले असेल. नाण्याच्या अग्रभागी अशोक स्तंभाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला भारत आणि इंडिया लिहिलेले असेल. अशोक स्तंभाखाली अंकित मूल्य रुपये शंभर लिहिलेले असेल.
सुधीर यांच्या माहितीनुसार, २ जुुलै २०२३ रोजी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मदिनी या नाण्याचे समारोहपूर्वक अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. बाजारात चलनात न येणारे हे एक स्मरणीय नाणे असेल. या नाण्याचे अनावरण केल्यानंतर भारत सरकारच्या टांकसाळीमार्फत एक संग्रही वस्तूंप्रमाणे विक्री केली जाईल. देश-विदेशातील बाबूजींचे चाहते आणि नाणे संग्राहक हे नाणे एक वारसा म्हणून जतन करून ठेवतील.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
बाबूजी या नावाने लोकप्रिय महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सेनानी, प्रखर गांधीवादी, राजकीय नेते, समाजसेवक, परोपकारी तसेच कुशल प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ स्व. जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म २ जुलै १९२३ रोजी यवतमाळच्या एका समृद्ध परिवारात झाला होता. किशोरावस्थेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. जवाहरलालजी १९७२ ते १९९५ पर्यंत चारवेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले. त्यांनी वसंतदादा पाटील, ए. आर. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार, सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ऊर्जा, उद्योग, सिंचन, नागरी विकास, अन्न व पुरवठा, वस्रोद्योग, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा यासारख्या महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्षही होते. जवाहरलालजी दर्डा यांना महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचे सूत्रधार आणि वैद्यकीय सुविधांतील व्यापक सुधारणांसाठी ओळखले जाते.
जवाहरलालजी दर्डा यांनी १९५२ मध्ये मराठी साप्ताहिक ‘लोकमत’ सुरू केले. लोकमत १९७१ मध्ये नागपूरमधून दैनिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. आज ‘लोकमत’ महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी दैनिक आहे. ‘लोकमत’ची नागपूर आवृत्ती यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. २५ नोव्हेंबर १९९७ रोजी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन झाले.