नवी दिल्ली : घरगुती बाजारात गव्हाची उपलब्धता कायम राहावी, सामान्यांना विकत घेण्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने खुल्या बाजार विक्री योजनेच्या (ओएमएसएस) अंतर्गत जानेवारी-मार्च २०२४ या कालखंडात भारतीय खाद्य मंडळाच्या (एफसीआय) भांडारातील २५ लाख टनांचा अतिरिक्त गहू विकण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे गव्हाच्या किमती नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होणार आहे. खाद्य सचिव संजीव चोपडा यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. सरकारने एफसीआयला गहू उत्पादक राज्यांमध्ये खरेदीचा अवधी वगळता संपूर्ण वर्षभर ओएमएसएस योजनेंतर्गत ई-लिलावाद्वारे घाऊक विक्रेत्यांना गहू विकण्याचे आदेश दिले होते.
ग्राहकांना मोठा लाभ साप्ताहिक ई-लिलावाच्या माध्यमातून एफसीआयने आतापर्यंत घाऊक विक्रेत्यांना ४४.६ लाख टन इतक्या गव्हाची विक्री केली आहे. यामुळे खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणावर गहू उपलब्ध झाला आहे.