नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था बुडविणे हेच मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे यश आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.५०० व २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात अनुक्रमे १०० टक्के व ५० टक्के वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. त्याबाबतच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितले की, ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनंतर बनावट नोटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था बुडविण्याचे काम मोदी सरकारने नोटबंदीच्या निर्णयाद्वारे केले.
बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते. मात्र बनावट नोटांची संख्या वारेमाप वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. त्याबाबत मोदी सरकार काही बोलणार आहे की नाही?देशातील काळ्या पैशाची समस्या संपविण्यासाठी तसेच दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी लागू केली होती. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आला होता.
शिवसेनेचीही टीकाशिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक शैलीत म्हणाल्या की, बनावट नोटांचे प्रमाण वाढणे हा नोटबंदीच्या निर्णयाचा एक मोठा फायदा असावा असे वाटू लागले आहे.