नवी दिल्ली : मंकीपॉक्सचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे देशात मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून येतात का यावर बारीक लक्ष ठेवायला हवे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे. जगभरात गेल्या २० दिवसांत मंकीपॉक्सचा २१ देशांमध्ये प्रसार झाला आहे. भारतात या संसर्गाने अद्याप एकही जण बाधित झालेला नाही. मात्र, केंद्र सरकार या आजाराबाबत सतर्क आहे.हा आजार २१ देशांत पसरला असून, एकूण रुग्णसंख्या २२६ झाली आहे.
विषाणूत एकही परिवर्तन नाही-
मंकीपॉक्सच्या विषाणूंमध्ये अद्याप एकही जनुकीय बदल झालेला नाही. मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतरही या विषाणूंमध्ये परिवर्तन झाल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले नाही.
अर्जेंटिनामध्ये दोन रुग्ण-
अर्जेंटिनामध्ये शुक्रवारी मंकी पॉक्सचे दोन रुग्ण सापडल्याने चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही विषाणूग्रस्त पुरुष रुग्ण नुकतेच स्पेनमधून अर्जेंटिना येथे आले आहेत. या विषाणूचे लॅटिन अमेरिकेत सापडलेले ते पहिले रुग्ण ठरले आहेत. स्पेन केंद्रबिंदू या महिन्यात जगभर पसरलेल्या मंकीपॉक्स संसर्गाचा केंद्रबिंदू स्पेन हा देश आहे. शुक्रवारपर्यंत स्पेनमध्ये या संसर्गाचे ९८ रुग्ण आढळले होते. मंकीपॉक्सचे ब्रिटनमध्ये आजवर १०६, पोर्तुगालमध्ये ७४ रुग्ण सापडले. त्याशिवाय कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, इटली, अमेरिकेसह अन्य देशांतही हा आजार पसरला आहे.