आज लागलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत या राज्यामध्ये विजयाची हॅटट्रिक केली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर हरयाणात मिळालेल्या दणदणीत विजयामुळे भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहेत. तसेच आज संध्याकाळी या विजयाचा आनंदोत्सव भाजपाकडून दिल्लीतील मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. आज हरयाणामध्ये खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली आहे. हरयाणाच्या जनतेने इतिहास रचला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, हरयाणामधील हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा परिणाम आहे. हरयाणामधील हा विजय पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि हरयाणामधील संघटनेच्या मेहनतीचा विजय आहे. तसेच हा विजय आमच्या विनम्र मुख्यमंत्र्यांचया कर्तव्यांचाही विजय आहे. आज नवरात्रीची सहावा दिवस आहे. माता कात्यायनीच्या उपासनेचा दिवस आहे. हा गीतेच्या भूमीवर सत्य, विकास आणि सुशासनाचा विजय आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील विजयाबद्दल नॅशनल कॉन्फ्रन्सचंही अभिनंदन केलं. ते म्हणाले की, आज अनेक दशकांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांततापूर्ण मार्गाने निवडणूक आणि मतमोजणी झाली. ही बाब लोकशाहीच्या विजयाची द्योतक आहे. मी आज मिळवलेल्या विजयासाठी नॅशनल कॉन्फ्रन्सचं अभिनंदन करतो.