नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या विरोधात सहा प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात एक हजार पानांचे आरोपपत्र सादर केले होते. ब्रिजभूषण यांच्याशिवाय महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांचेही नाव आरोपींमध्ये आहे. आरोपपत्रात कुस्तीपटूंना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब महत्त्वाचा मानण्यात येतो. ब्रिजभूषण यांच्या विरोधात सात साक्षीदार समोर आले आहेत. त्याचवेळी लैंगिक शोषणाच्या कथित ठिकाणी त्यांच्या उपस्थितीचे पुरावेही सापडले आहेत.
निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा आक्षेपभारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका आता ११ जुलै रोजी होणार आहेत. यापूर्वी या निवडणुका सहा जुलै रोजी होणार होत्या. मात्र, पाच राज्यांच्या कुस्ती संघटनांच्या आक्षेपानंतर त्यात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र, हिमाचल, हरयाणा, राजस्थान व तेलंगणा ही आक्षेप घेणारी राज्ये आहेत. निवडणूक अधिकारी महेश कुमार मित्तल यांनी बुधवारी नवीन वेळापत्रक जाहीर केले.
या कलमांन्वये आरोपपत्रकुस्तीपटूंप्रकरणी आम्ही कलम ३५४, ३५४-अ आणि ड अंतर्गत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विनोद तोमर यांच्याविरुद्ध कलम १०९, ३५४, ३५४ (अ), ५०६ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.