मेरठ - हेलिकॉप्टर लुटल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. पायलट रवींद्र सिंह यांनी मेरठच्या एसएसपींकडे याबाबत तक्रार केली आहे. १५ ते २० जण जबरदस्तीने डॉ. भीमराव आंबेडकर हवाई मार्गावर आले आणि मारहाण करत हेलिकॉप्टरचे भाग वेगळे करून ट्रकमधून भरून घेऊन गेले.
गुंडांनी धमकावून शांतपणे उभे राहा अन्यथा दोन्ही पाय कापून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर हेलिकॉप्टरचे भाग वेगळे करून, ट्रकमध्ये भरून घेऊन ते गेले. १६ टायर असलेल्या ट्रकवर राजस्थानचा नंबर होता, असे पायलटने तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीची दखल नाही, पायलटचा आरोप
एसएआर एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित पायलट रवींद्र सिंह यांनी लुटीची तक्रार दिली होती. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर कॅप्टन सिंह या कंपनीत काम करत आहेत. वारंवार तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घटनेवेळी पोलिसांचे पथक आले होते, मात्र त्यांनी गुंडांना रोखले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.