जंगलात सापडला हजारो वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक खजिना, मंदिर, गुहा, मूर्तींसह या वस्तूंचा समावेश, पाहून संशोधकही अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:14 PM2022-09-29T12:14:36+5:302022-09-29T12:18:31+5:30
Ancient Treasures: बांधवगड राखीव जंगलामध्ये नवव्या शतकातील मंदिर आणि बौद्ध मठ सापडले आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा १७५ चौकिमी क्षेत्रात सापडला आहे. हे सर्व अवशेष १२०० वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असण्याची शक्यता आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील बांधवगड राखीव जंगलामध्ये नवव्या शतकातील मंदिर आणि बौद्ध मठ सापडले आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा १७५ चौकिमी क्षेत्रात सापडला आहे. हे सर्व अवशेष १२०० वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने सांगितले की, येथे २६ मंदिरं, २६ गुहा, २ मठ, २ स्तुप, २४ अभिलेख. ४६ कलाकृती आणि १९ बांधलेली तळी सापडली आहेत. तसेच गुहांमधून बौद्ध धर्माशी संबंधित ऐतिहासिक आणि रोमांचक माहिती समोर आली आहे.
एएसआने सांगितले की, बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये २६ गुहा सापडल्या आहेत. काही गुहा ह्या बौद्धकालीन असल्याचे पुरावे सापडले आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या गुहा असतात, तशाच प्रकारच्या ह्या गुहा आहेत. हे काम एएसआय जबलपूर सर्कलच्या टीमने पूर्णत्वास नेले आहे.
या गुहांमध्ये ब्राह्मी लिपीमधील अनेक लेख सापडले आहेत. त्यामध्ये मथुरा, कौशांबी, पवत, वेजभरदा, सपतनाइरिकासारख्या जिल्ह्यांची नावं आहेत. ते श्री भीमसेना, महाराजा पोथारिसी, महाराजा भट्टादेवा यांच्या काळातील आहेत. तसेच येथए पुरातत्त्व विभागाला २६ प्राचीन मंदिरंही सापडली आहेत. त्यामध्ये श्री विष्णूंची निद्रासनातील मूर्तीसह मोठमोठ्या वराह प्रतिमा सापडल्या आहेत.
ही मंदिरं सुमारे दोन हजार जुने आहेत. पहिल्या पातळीवर केलेल्या सर्वेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या खजिन्यामुळे पुरातत्त्व विभागाचा उत्साह वाढला आहे. या गुहा मानवनिर्मित आहेत. तसेच या गुहांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाली हे, असे एएसआयच्या जबलपूर विभागाचे सुप्रिटेंडेंट शिवकांत वाजपेयी यांनी सांगितले.
दरम्यान, बांधवगडचा ऐतिहासिक उल्लेख नारद पंचरात्र आणि शिवपुराणामध्ये आहे. अयोध्येला परतत असताना श्रीरामाने हे क्षेत्र लक्ष्मणाला भेट म्हणून दिले होते, अशी दंतकथा आहे. बांधवगडच्या फॉरेस्ट रिझर्व्हमध्ये १९३८ मध्येही गुहांचा शोध घेण्यात आला होता.