अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात जानेवारी २०२४ मध्ये प्रभू रामाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशविदेशातील लोक उत्सुक असून, शहरातील बहुतांश हॉटेल व धर्मशाळांतील सुमारे ४ हजार खोल्यांचे २० ते २४ जानेवारी २०२४ या ५ दिवसांसाठी आगाऊ बुकिंग झाले आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अधिकृत तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. मात्र, १५ ते २४ जानेवारी या काळात शुभ मुहूर्त असल्यामुळे या काळात प्राणप्रतिष्ठा होऊ शकते, असा अंदाज आहे.
प्राणप्रतिष्ठेच्या तारखेची फोनवरून विचारणा -अयोध्येतील प्रसिद्ध जानकी महल ट्रस्टचे व्यवस्थापक आदित्य सुल्तानिया यांनी सांगितले की, लोक फोन करून प्राणप्रतिष्ठेची तारीख विचारत आहेत. तारीख निश्चित नाही, असे सांगितल्यावर ते २० ते २४ जानेवारी असे ५ दिवसांसाठी खोल्या बुक करत आहेत.
श्रीराम हॉटेलचे मालक अनूप कुमार गुप्ता यांनी सांगितले की, २० ते २४ जानेवारी या काळासाठी आमच्या हॉटेलातील बहुतांश सर्व खोल्या बुक झाल्या आहेत. अयोध्येतील सर्वच हॉटेल व धर्मशाळांची हीच स्थिती आहे.
२० टक्के खोल्या व्हीव्हीआयपींसाठी राखीवअयोध्येत हॉटेल, लॉज व धर्मशाळांत सुमारे ५ हजार खोल्या आहेत. यातील ८० टक्के म्हणजेच ४ हजार खोल्या बुक झाल्या आहेत. २० टक्के म्हणजेच १ हजार खोल्या पाहुणे व व्हीव्हीआयपी यांच्यासाठी राखीव आहेत. अयोध्येत भक्तांची गर्दी सातत्याने वाढत आहे. रोज ४० हजार लोक अयोध्येला येत आहेत.