लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांना बाहेर काढून संपूर्ण स्टेडियम रिकामे करविणारे संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू डुग्गा या आयएएस अधिकारी दाम्पत्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. खिरवार यांना लडाखमध्ये, तर रिंकू यांना अरुणाचल प्रदेशमध्ये फेरनियुक्तीचे आदेश आले आहेत. केंद्रीय गृहखात्याने यासंदर्भात अहवाल मागविला हाेता. ताे प्राप्त झाल्यानंतर लगेच कारवाई करण्यात आली.
आयएएस अधिकारी दाम्पत्य त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी दिल्लीतील त्यागराज स्टेडियम रिकामे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला हाेता. यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला हाेता. त्यानंतर गृहखात्याने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडे अहवाल मागविला हाेता. ताे मिळाल्यानंतर दाम्पत्याची तडकाफडकी दिल्लीबाहेर बदली करण्यात आली. या घटनेनंतर दिल्ली सरकारने सर्व क्रीडा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
दाेघेही एकाच तुकडीचे अधिकारीसंजीव खिरवार हे दिल्लीत महसूल विभागाचे प्रधान सचिव हाेते. त्यांना लडाखमध्ये, तर त्यांची पत्नी रिंकू यांना सुमारे तीन हजार किलाेमीटर लांब अरुणाचल प्रदेशमध्ये पाठविण्यात आले आहे. दाेघेही १९९४च्या तुकडीचे अधिकारी आहेत. एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला हाेता.
बदलीवरून तृणमूलची टीकारिंकू डुग्गा यांना अरुणाचल प्रदेशात पाठविण्यावरून तृणमूलच्या खासदार महुआ माेईत्रा यांनी टीका केली असून, दिल्लीतील कचरा ईशान्येकडे टाकण्यात आल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.