पवारांच्या निर्णयाचा देशपातळीवर परिणाम, काँग्रेसच्या बड्या नेत्याला 'हा' विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 02:47 PM2023-05-02T14:47:07+5:302023-05-02T14:48:25+5:30
शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यातील सदस्यच निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी आज घोषणा केली. त्यानंतर, राष्ट्रवादी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. पवार यांच्या या निर्णयाचा केवळ राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीवरच नाही, तर देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळेच, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने व्हिडिओतून पवारांना विनंती केलीय.
शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा शेकडो कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक भाषण करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही तात्काळ ट्विट करत पवार यांना हा निर्णय मागे घ्यावा लागेल, असे सूचवले. आता, काँग्रेसचे वरिष्ठ नेते रशीद अल्वी यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून शरद पवारांना विनंती केलीय.
VIDEO | "Sharad Pawar is a respected leader. This is an internal matter of his party, but he will continue to play an important role in opposition," says Congress leader Rashid Alvi #SharadPawarpic.twitter.com/ge20MOMy2C
— Press Trust of India (@PTI_News) May 2, 2023
शरद पवार हे केवळ त्यांच्या पक्षाचेच नाहीत, तर संपूर्ण देशाचे आदरणीय आणि ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहावे की नाही राहावे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र, विरोधी पक्षात त्यांचा एक वेगळंच वजन आहे. त्यामुळे, विरोधी पक्षासाठी ते काम करत राहतील, अशी मला आशा आणि विश्वास आहे, असे काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी म्हटलं आहे.
भाषणात काय म्हणाले शरद पवार
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अवरित चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्याचा माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.