नवी दिल्ली : आपल्या दिल्लीतील पहिल्याच निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना महाभ्रष्टाचारी संबोधले. तसेच काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, राजधानीत काँग्रेस पक्षाला चार जागाही लढवता आल्या नाहीत. दिल्लीतील इंडी आघाडीने महाभ्रष्टाचाऱ्यांशी गळाभेट घेतली आहे. दिल्लीत ते मैत्री दाखवत आहेत, पण पंजाबमध्ये दोघांमध्ये कुस्ती होत आहे, असा टाेला माेदी यांनी लगावला.
पंतप्रधान म्हणाले की, "त्यांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे आहे. त्यांना एससी, एसटी, ओबीसी यांचे हक्क हिसकावून, मुस्लिमांना द्यायचे आहेत. त्यांना कलम ३७० पुन्हा लागू करायचं आहे. अयोध्या राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही रद्द करायचा आहे. काँग्रेसचे सरकार रिमोटने चालवले जात होते, दिल्लीतील हजारो मोक्यावरच्या सरकारी मालमत्ता काँग्रेसच्या काळात वक्फला देण्यात आल्या. काँग्रेसला सर्वसामान्यांची संपत्ती हिसकावून घ्यायची आहे.
लोकसोचे ‘कुरुक्षेत्र’, विकास विरुद्ध व्होट जिहाद! लोकसभा निवडणूक हे ‘कुरुक्षेत्र’ असून त्यात भाजपचा विकास आणि विरोधकांचा ‘व्होट जिहाद’ यांच्यात खरी लढत असून, यापैकी एकाची निवड मतदारांना करायची आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी हरियाणातील गोहाना येथील जाहीर सभेत केले. त्यांनी सांगितले की, विरोधकांना कोणतीही किंमत मोजून सत्ता हवी आहे आणि ही किंमत आहे देशाची सुरक्षा व स्थिरता यांचा बळी. आपल्या धाकड सरकारने घटनेतील ३७० कलमाची भिंत पाडून टाकली, त्यामुळे आता काश्मीर विकासाच्या मार्गावर घोडदौड करीत आहे.
युपी आता तोफगोळ्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध : शाह -गावठी पिस्तुले बनविण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला उत्तर प्रदेश आता लष्करास तोफगोळे बनविण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर या राज्यात इतका मोठा बदल झाला, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झाशी येथील भाजपच्या उमेदवार अनुराग शर्मा यांच्यासाठी आयाेजित प्रचारसभेत केला. त्यापूर्वी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी अमित शाह यांनी अमेठीत ‘रोड शो’ करून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासाठी मते मागितली.