पंजाब में तो इस बार झाडू चल रहा है भाई...; भ्रष्टाचारमुक्त कारभाराची भुरळ, एकदा ‘आप’ला संधी देण्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:59 AM2022-02-13T07:59:22+5:302022-02-13T08:00:16+5:30
केजरीवाल यांच्या पराभव करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपने आपले मतदान काँग्रेसकडे वळविल्याचेही येथे सांगण्यात आले. भाजपला, काँग्रेसपेक्षा केजरीवाल यांची भीती जास्त वाटते कारण ते सरकार चांगले चालवून दाखवितात अशीही चर्चा लोकांत आहे.
विश्वास पाटील -
चंदीगड : विधानसभेच्या या निवडणुकीत पंजाबच्या जनतेचा मूड बदलला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सामान्य रिक्षाचालकांपासून ते सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय सर्व लोकांच्या बोलण्यात एकच वाक्य शुक्रवारपासून ऐकत आहे, भाईसाब, पंजाब तो इसबार झाडू की हवा है..आतापर्यंत शिरोमणी अकाली दलास संधी दिली, काँग्रेसलाही संधी देऊन पाहिली आता एकदा आपला संधी देऊ अशी मानसिकता पंजाबी लोकांतून दिसून येत आहे. ही हवा अशीच राहिली तर पंजाबमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता ठळक दिसत आहे.
आपला लोकांची पसंती होण्याची दोन-तीन महत्त्वाची कारणे दिसतात. पंजाबची सीमा दिल्लीपर्यंत भिडली आहे. दिल्लीमध्ये गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवून दाखविले, त्याबद्दल पंजाबी जनतेतही प्रचंड क्रेझ आहे. केजरीवाल सरकारच्या अन्य कोणत्याही वायद्यापेक्षा लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार ही केजरीवाल यांची प्रतिमा जास्त भावली आहे. त्यामुळेच सर्वच स्तरांतील लोक आपला संधी देण्याची भूमिका अगदी उघडपणे बोलून दाखवित आहे. त्यामध्ये लढत कुणाची होणार याबद्दलही ते बोलायला तयार नाहीत. थेट आपला निवडून देण्याची भाषाच ते करत आहे.
दिल्ली पॅटर्नची भीती...
केजरीवाल यांच्या पराभव करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपने आपले मतदान काँग्रेसकडे वळविल्याचेही येथे सांगण्यात आले. भाजपला, काँग्रेसपेक्षा केजरीवाल यांची भीती जास्त वाटते कारण ते सरकार चांगले चालवून दाखवितात अशीही चर्चा लोकांत आहे.
गतनिवडणुकीत जोरदार लढत
गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ११२ जागा लढवल्या होत्या. त्यांच्या उमेदवारांना ३६ लाख ६२ हजार मते मिळाली. एकूण मतांतील ही २३.७ टक्के मते आहेत. पहिल्यांदाच लढत देऊन आपने २० जागा जिंकल्या होत्या. आपचे २१ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पंजाबच्या ११७ सदस्यांच्या विधानसभेत ५९ हा बहुमताचा आकडा आहे. गतनिवडणुकीतील एक व दोन नंबरवर असलेल्या उमेदवारांचा विचार करता त्या जागा जिंकून आपला आणखी १८ आमदार निवडून आणावे लागतील.