कोलकाता : शेकडो बांगलादेशी नागरिकांनी शुक्रवारी सकाळी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. ही घटना पश्चिम बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात घडली. त्यामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
हिंसाचारामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. त्यानंतर बॉर्डर गार्ड्स बांगलादेश या दलाने या सर्व लोकांना माघारी पाठवले. कुचबिहार जिल्ह्याला लागून असलेल्या बांगलादेशमधील लालमोनिरहाट जिल्ह्यातील गेंदुगुरी, डोईखावा या गावांमधील हे नागरिक होते. त्यातील बहुतांश हिंदू होते, असे सांगण्यात आले.
सीमेवरील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती भारत-बांगलादेश सीमेवरील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) पूर्व कमांडमधील अतिरिक्त महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली.