नवी दिल्ली - १९४७ साली भारत देशाला स्वातंत्र्य नक्कीच मिळाले, पण त्याचवेळी फाळणीच्या रूपाने अशी एक जखम मिळाली जी आयुष्यभर वेदना देत राहील. पाकिस्तान या वेगळ्या देशाची स्थापना करत भारत देशाचे दोन तुकडे केले. मोहम्मद अली जिना यांच्या हट्टाने लाखो लोकांचे प्राण घेतले आणि करोडो लोक बेघर झाले. दोन्ही देशांदरम्यान एक बॉर्डर आखण्यात आली. अनेक गोष्टींची विभागणी केली. यापैकी एक असलेली ब्रिटीश काळातील ओपन एअर बग्गी, जी भारत किंवा पाकिस्तानच्या या दोघांपैकी एकाच्या वाट्याला येणार होती. आता या बग्गीची अचानक चर्चा का होत आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रमुख पाहुणे म्हणून आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या बग्गीतून सवारी केली. ४० वर्षांनी पुन्हा या बग्गीचे आगमन झाले. या बग्गीचा अतिशय रंजक असा इतिहास आहे तो जाणून घेऊया.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनी ब्रिटीश राजवटीतील भारताच्या व्हाईसरॉयच्या बग्गीत बसले होते. ६ घोड्यांनी ओढली जाणारी, सोन्याच्या कड्या, आतील भाग लाल मखमली कापडाचा आणि अशोक चक्र असलेली ही काळ्या रंगाची शाही बग्गी व्हाईसरॉयची शान असायची. त्याचा उपयोग औपचारिक कार्यक्रमांसाठी आणि राष्ट्रपती भवन (तेव्हाचे व्हाईसरॉयचे निवासस्थान) भोवती फिरण्यासाठी केला जात असे. ब्रिटीश राजवट संपल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी ही आलिशान बग्गी आपल्यालाच मिळावी असे प्रयत्न केले. तेव्हा ही बग्गी कोणत्या देशाला मिळेल हे ठरवण्यासाठी दोन्ही देशांनी एक अनोखी युक्ती लढवली.
ही काळ्या रंगाची शाही बग्गी कोणत्या देशाला मिळेल यासाठी टॉस उडवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर भारताचे कर्नल ठाकूर गोविंद सिंग आणि पाकिस्तानचे साहिबजादा याकूब खान यांनी एक नाणे उडवून हा कौल नशिबावर सोडला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या टॉसने बग्गीचे भवितव्य ठरवले होते. नशीब भारताच्या सोबत होते आणि ही बग्गी भारताच्या वाट्याला आली. कर्नल सिंग यांनी भारतासाठी ही बग्गी जिंकली. त्यानंतर राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवन ते संसदेपर्यंत शपथविधी सोहळ्याला जाण्यासाठी या बग्गीचा वापर केला. प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाच्या वेळी विजय चौकात आयोजित करण्यात आलेल्या बीटिंग रिट्रीट समारंभात राष्ट्रपतींना नेण्यासाठीही या बग्गीचा वापर करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या काही वर्षांनंतर राष्ट्रपतींसाठी या खुल्या बग्गीचा वापर कमी झाला. सुरक्षेच्या कारणास्तव ही बग्गी जास्त न चालवण्याचा निर्णय झाला. या पारंपारिक बग्गीच्या जागी बुलेटप्रूफ कार आल्या. परंतु ४० वर्षांनी आज प्रजासत्ताक दिनी पुन्हा ही बग्गी राष्ट्रपतींनी आणली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह बग्गीत सवार झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी कर्तव्यपथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि भारतीय सैन्य दलाचे तिन्ही प्रमुख उपस्थित होते.