नवी दिल्ली - भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनावर देशभरात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कुस्तीपटूंनी आपलं पदक गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी, ते हरिद्वार येथील गंगा घाटावरही पोहोचल्या, पण शेतकरी नेत्यांनी त्यांच्याकडे ५ दिवसांची मुदत मागितली. त्यानंतर, त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. याबाबत आता केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर व केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी भाष्य केले.
नियमानुसार तपास केला जाईल. तपास पूर्ण होईपर्यंत खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागेल. खेळाडूंना किमान सर्वोच्च न्यायालय, पोलीस, क्रीडा विभागावर विश्वास ठेवावा लागेल, असे अनुराग ठाकूर म्हणाले. तर, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनीही यावर भाष्य केलं आहे. तसेच, बबिता फोगाट या पैलवानांचं समर्थन का करत नाहीत, ती तर कुटुंबातील सदस्य आहे, असे म्हणत स्मृती इराणी यांनी पैलवानांना संदेश दिला आहे.
स्मृती इराणी यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत खेळाडूंच्या आंदोलनावर भाष्य केलं. याप्रकरणी माझी बबिता फोगाटसोबत चर्चा झाली. तुम्हाला असं वाटतंय का, बबिता फोगाट त्या लोकांची साथ देईल, ज्यांनी दुसऱ्यांचं, विशेषत: तिच्या घरातील सदस्यांचं शोषण केलंय. मुद्दा हा नाही की पैलवानांनी सायंकाळी पदक गंगा नदीत विसर्जित करण्याची घोषणा केली होती, पण केलं नाही. तर, कायद्याची माहिती ठेवणारांना माहिती आहे, की कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जर आता कुठला हस्तक्षेप झाला तर तो महिलांविरुद्ध जाईल. विरोधी पक्षातील नेते पैलवानांना निष्पक्ष तपासापासून का वंचित ठेऊ इच्छित आहेत, हे मला माहिती करून घ्यायचे आहे. तुम्हाला असं वाटतंय का, बबिता फोगाट अशीच तिच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध उभा आहे का?, असा सवालही स्मृती इराणी यांनी केला.
अनुराग ठाकूर यांचही आवाहन
खेळाडूंनी काय प्रश्न उपस्थित केला आहे, याची निष्पक्ष चौकशी व्हावी. चौकशीनंतर कारवाई व्हावी. पोलीस तपास करत आहेत. त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी, अशी आमचीही इच्छा आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. तसेच, आगामी काळात महत्त्वाचे सामने होणार आहेत. आम्ही सर्व खेळाडूंसोबत आहोत. इतर खेळाडू आणि खेळांचे नुकसान होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केले.