चंदिगड : पंजाबमध्ये १३ जागांसाठी लोकसभेचा रणसंग्राम सुरू असून, केंद्रातील सत्ताधारी भाजपसह पंजाबमधील सत्ताधारी आपलाही शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. २० लाख शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व १३ जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. दुसरीकडे २०१९ मध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला गळती लागल्याने स्वकियांशीच लढावे लागत आहे.
२३ पिकांना कायद्याने एमएसपीची गॅरंटी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचा सर्वाधिक रोष सत्ताधारी भाजपावर आहे. भाजपाच्या उमेदवारांना प्रचारासाठीही शेतकरी मतदार संघात फिरू देत नसल्याची सध्याचे स्थिती आहे. दुसरीकडे पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीने एमएसपी जाहीर करण्याचे तसेच पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे आपलाही शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांवरही शेतकऱ्यांची नाराजी आहे.
पंजाबमध्ये २० लाख शेतकरी मतदार आहेत. या अन्नदात्याची नाराजी दूर करण्यासाठी या सगळ्याच पक्षांच्या पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
अनेक नेत्यांनी साेडली काँग्रेसची साथ २०१९ च्या निवडणुकीमध्ये १३ पैकी ८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला यावेळेस मात्र स्वकीय यांनीच पछाडले आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, पटियालाचे खासदार तथा माजी मंत्री परीनीत कौर, तीन वेळा खासदार असलेले रवनितसिंह बिट्टू अशी दिग्गज मंडळी काँग्रेसला सोडून भाजपामध्ये दाखल झाली आहे. याशिवाय आमदार राजकुमार चब्बेवाल, आमदार गुरुप्रीतसिंह जीपी यांनीही काँग्रेस सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसला पंजाबमध्ये सध्या स्वकीयांसोबतच लढाई करण्याचे माेठे आव्हान आहे.