नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ‘गेमचेंजर’ ठरला, असे मत राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेले सातपैकी पाच मुद्दे घटनापीठाने फेटाळून लावले असून त्यांनी केलेला विजयाचा दावा पोकळ असल्याचा टोला जेठमलानी यांनी लगावला.
शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर तीन ते सहा महिन्यांत निर्णय घेतील, अशी अपेक्षा जेठमलानी यांनी व्यक्त केली.
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तिथेच त्यांचा खेळ संपला आणि याच मुद्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला कलाटणी दिली, असे जेठमलानी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या विधिज्ञांमध्ये जेठमलानी यांचा समावेश होता.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांमध्ये एकूण सात मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यापैकी केवळ दोनच मुद्दे मान्य करून घटनापीठाने पाच मुद्दे फेटाळून लावले, असे जेठमलानी म्हणाले.
गाेगावले पुन्हा मुख्य प्रतोदपदी?
राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश द्यायला नको होते, हा त्यातील पहिला मुद्दा होता; पण उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाही. त्यामुळे तो मुद्दा आधीच निष्प्रभ ठरला होता.
दुसरा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून दिलेली मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे; पण गोगावलेंची नियुक्ती रद्दबातल करताना त्यांची पुन्हा मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेली नाही.
शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर पुन्हा विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची वैधता मान्य केली आहे, तरीही आमचीच सरशी झाली असे उद्धव ठाकरे म्हणत असतील तर तो पोकळ विजय ठरला आहे, अशी टीका जेठमलानी यांनी केली.