नवी दिल्ली : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने वेरूळ येथील जैन कीर्तिस्तंभ हटविण्याच्या हालचालींना अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला. दिल्लीत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी, अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे महासंचालकांसोबत झालेल्या बैठकीत हा स्तंभ ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय झाला.
यासंदर्भातील आदेश लवकरच एएसआय औरंगाबाद मंडळाला पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. एएसआय औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षक कार्यालयाने कीर्तिस्तंभ हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना निवेदन दिले होते. त्यावर यासंदर्भात दिल्लीत पुरातत्व विभागासोबत बैठक घेण्याचे आश्वासन कराड यांनी दिले होते. दरम्यान, सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांनीही समाजभावना ओळखून कीर्तिस्तंभ हटवणार नसल्याचे आश्वासन दिले होते. जैन कीर्तिस्तंभ ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी दिल्लीत पोहोचलेल्या शिष्टमंडळाला लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्लीत राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यासह शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेतली. यावेळी समाजबांधवांच्या भावना समजून घेत त्यांनी एएसआयच्या महासंचालक विद्यावती यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि एएसआयचे एडीजी अलोक त्रिपाठी यांची बैठक घेतली. बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. कराड आणि आ. प्रशांत बंब यांनी कीर्तीस्तंभाबाबतच्या समाजभावना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. जैन कीर्तिस्तंभ हटवण्याचा प्रस्ताव रद्द करून ‘जैसे थे’ ठेवण्यासंदर्भात औरंगाबाद एएसआय अधीक्षक कार्यालयाला पत्राद्वारे लेखी कळवण्याची मागणी केली. त्याला महासंचालक विद्यावती यांनी होकार दिला, असे वेरूळ येथील श्री. पार्श्वनाथ ब्रह्माचार्य आश्रम (जैन गुरुकुल) संस्थेचे अध्यक्ष वर्धमान पांडे यांनी सांगितले. बैठकीस सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष डी. बी. कासलीवाल, संजय पापडीवाल, हर्षवर्धन जैन यांची उपस्थिती होती. भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाठपुराव्याला यश मिळाल्याची बातमी समजताच सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.