भारतीय प्रवाशांनी भरलेले एक विमान जमैकाने दुबईला माघारी पाठवल्याप्रकरणी भारतसरकारची प्रतिक्रिया आली आहे. खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. आता यासंदर्भात, स्थानिक अधिकारी प्रवाशांच्या कागदपत्रांवर समाधानी नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले आहे की, विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले होते आणि ते 7 मे रोजी किंग्स्टनवरून निघाले होते. आपल्या साप्ताहीक प्रेस नोटमध्ये जायस्वाल यांनी म्हटले आहे, "मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीमध्ये नोंदणीकृत चार्टर्ड फ्लाइट 2 मे रोजी पर्यटनाच्या उद्देशाने भारतीयांसह दुबईहून किंग्स्टनला पोहोचले. त्यांनी हॉटेलचे बुकिंग आधीच करून ठेवले होते."
जायस्वाल पुढे म्हणाले, "स्थानिक अधिकारी पर्यटक म्हणून त्यांच्या कागदपत्रांवर समाधानी नव्हते. विमान आणि प्रवाशांना दुबईला परतण्याचे आदेश देण्यात आले. 7 मे रोजी प्रवाशांनी किंग्स्टनवरून निघाले". ‘जमैका ऑबझर्वर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 253 परदेशी प्रवासी होते. सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला.