चंडीगड : भटिंडा लष्करी तळावर चार जवानांच्या हत्येप्रकरणी एका लष्करी जवानाला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.
भटिंडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुलनीत सिंग खुराना यांनी सांगितले की, अटक केलेल्या जवानाचे नाव मोहन देसाई आहे. पूर्ववैमनस्यातून त्याने हे हत्याकांड घडविले. १२ एप्रिल रोजी भटिंडा येथील लष्करी ठाण्याच्या आत झोपेत असताना चार जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.यासंदर्भात भटिंडा कॅन्टोन्मेंट पोलिस ठाण्यात २ अज्ञात व्यक्तींविरुद्ध ‘भादंवि’च्या कलम ३०२ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.
देसाई मोहन यांनीच यापूर्वी गोळीबारानंतर पांढरा कुर्ता-पायजामा घातलेले, तोंड व डोके कापडाने झाकलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना बॅरेकमधून बाहेर पडताना पाहिले होते, असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. त्यांच्यापैकी एकाकडे इन्सास रायफल आणि दुसऱ्याकडे कुऱ्हाड होती, असे त्यांनी पोलिस तक्रारीत म्हटले होते. गोळीबारात सागर बन्ने, कमलेश आर, योगेश कुमार जे, संतोष कुमार नागराल यांचा मृत्यू झाला होता.भटिंडा लष्करी तळ हा देशातील सर्वांत मोठ्या लष्करी तळांपैकी एक आहे आणि येथे सैन्याच्या अनेक तुकड्या तैनात आहेत.