तिरुवनंतपुरम : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले ‘आदित्य एल १’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-१’ बिंदूवर पोहाेचण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम येथे सांगितले.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इस्रो प्रमुख बोलत होते. ते म्हणाले की, आदित्यचा निर्धारित प्रवास सुरळित सुरू आहे. मला वाटते की, ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आले आहे.
१.५ दशलक्ष किमीचा प्रवास- ‘आदित्य-एल १’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली मोहीम आहे. हे यान १२५ दिवसांत पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किलोमीटर प्रवास केल्यानंतर एल-१ भोवतीच्या प्रभामंडल कक्षेत प्रवेश करेल. - एल-१ बिंदू सूर्याच्या सर्वांत जवळचा मानला जातो. ‘आदित्य एल १’ सूर्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करून त्याची छायाचित्रे पृथ्वीवर विश्लेषणासाठी पाठवेल.
यानाची एल-१ बिंदूच्या परिघात पोहोचण्याची अंतिम तयारी सुरू आहे. ही प्रक्रिया ७ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असेही सोमनाथ म्हणाले.