हरीश गुप्तानवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन लाटेची मध्यावस्था सुरू आहे. या विषाणूचा संसर्ग ९० टक्के शहरांमध्ये पसरला आहे. सध्या नव्या रुग्णांमध्ये ९२ ते ९५ टक्के लोक हे ओमायक्रॉनने बाधित असतात, असे केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात नेमलेल्या कृती गटाचे प्रमुख व इन्साकॉग गटाचे अध्यक्ष प्रा. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे. कोरोना महामारी संपण्याच्या दिशेने या संसर्गाचा प्रवास सुरू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. अरोरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, कोरोनाची महामारी कधी संपेल, हे नक्की सांगता येणार नाही. मात्र, या महामारीची तीव्रता कमी होऊन ती केवळ साथ म्हणून उरणार आहे.
कोरोना साथ लवकर संपण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. प्रा. एन. के. अरोरा म्हणाले की, ओमायक्राॅनची लाट ही सामूहिक प्रतिकारशक्तीची सुरुवात आहे, असे मी म्हणणार नाही. कारण सामूहिक प्रतिकारशक्ती ही एखाद्या मृगजळासारखी असते. ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार हा सामुदायिक संसर्गाच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे. ओमायक्रॉन लाटेतील स्थिती डेल्टा लाटेपेक्षा बरी आहे. ते म्हणाले की, डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कमी घातक आहे.
‘हा’ प्रश्न यू-ट्यूबवरच्या तज्ज्ञांना विचाराओमायक्रॉनची लाट केव्हा संपुष्टात येईल, असा प्रश्न कोरोना कृती गटाचे प्रमुख प्रा. एन. के. अरोरा यांना विचारला होता. त्यावर ते म्हणाले की, हा प्रश्न यू-ट्यूबवर जे तज्ज्ञ कोरोना साथ संपण्यासंदर्भात विविध भाकिते करत असतात त्यांना विचारा.