हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका न्यायाधिशाने आपल्या राहत्या घरीच पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. ते आबकारी प्रकरणाचे प्रथम श्रेणी न्यायाधीश होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत झालेल्या क्षुल्लक भांडणानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वडिलांच्या तक्रारीवरून, अंबरपेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास 36 वर्षीय न्यायाधीश ए मणिकांत यांचे पत्नी सोबत भांडण झाले होते. काही आवाज ऐकून घरातील लोक त्यांच्या बेडरूमकडे धावले, तेव्हा ते पंख्याला लटकलेले असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत संशयास्पद मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या महिन्यात अगदी अशीच घटना उत्तर प्रदेशातील बदायूंमधूनही समोर आली होती. येथील दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ न्यायाधीश ज्योत्स्ना राय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याची सुसाईड नोटही सापडली होती. त्या, वेळेवर न्यायालयात पोहोचल्या नाही, म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन रिसिव्ह होत नसल्याने, ते त्यांच्या घरी पोहोचले. त्याची बेडरूम बंद होती. दरवाजा तोडला असता त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बदायूंपूर्वी त्या अयोध्येत न्यायदंडाधिकारी होत्या. महत्वाचे म्हणजे, त्या डिप्रेशनने त्रस्त असल्याचेही सांगण्यात आले होते.