नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर अनेकजण विरोधात आपल मत मांडत आहेत. विशेष म्हणजे काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. या चित्रपटावरुन चांगलाच वादही होत असल्याचे दिसून येते. त्यातच, केरळकाँग्रेसने काश्मीर पंडितांच्या जम्मू काश्मीरमधील पलायनासदर्भात अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटला अनेकांनी प्रत्युत्तर देत हा मुद्दा खोटा ठरवला आहे.
केरळकाँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळ काँग्रेसने कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले होते. ''ज्यानी कश्मिरी पंडितांना लक्ष्य केले ते दहशतवादी होते. सन 1990 ते 2007 या कालावधीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली आहे. तर, या 17 वर्षांच्या कालावधीत 15 हजार मुसलमांनाची दहशतवाद्यांनी हत्या केली.'', असे केरळ काँग्रसने म्हटले आहे. तसेच, काश्मिरी पंडिताचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशानुसार झाले होते, जे स्वत: आरएसएसचे होते.