नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) जबरदस्त कमाई केली आहे. पब्लिक आणि क्रिटिक्स दोन्हीकडून या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. अनेकांनी या चित्रपटात मांडलेल्या विषयाचं आणि चित्रपटाच्या मांडणीचंही कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी दोषी ठरवलं जात आहे.
फारुख अब्दुल्ला यासाठी जबाबदार असल्याचीही टीका होत होती. यावर आता अब्दुल्ला यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. मी या घटनेसाठी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या असं म्हटलं आहे. "जेव्हा तुम्ही या घटनेच्या चौकशीसाठी एक प्रामाणिक न्यायाधीश किंवा समिती स्थापन कराल तेव्हा सत्य बाहेर येईल. या घटनेला कोण जबाबदार आहे ते तुम्हाला कळेल. जर फारूख अब्दुल्ला जबाबदार असेल तर फारुख अब्दुल्ला देशात कुठेही फाशी घ्यायला तयार आहे."
"मला वाटत नाही की या घटनेला मी जबाबदार आहे"
"मी फाशी घ्यायला तयार आहे. पण जे लोक जबाबदार नाहीत त्यांना कोणत्याही पुराव्यांशिवाय दोष देऊ नका" असं फारुख अब्दुल्ला इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे. "मला वाटत नाही की या घटनेला मी जबाबदार आहे. जर लोकांना त्यावेळी घडलेलं कटू सत्य जाणून घ्यायचं असेल, तर त्यांनी त्यावेळचे इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख किंवा केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी बोलले पाहिजे जे त्यावेळी केंद्रीय मंत्री होते."
"चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन केले पाहिजे"
"1990 च्या दशकात केवळ काश्मिरी पंडितांचेच नव्हे तर काश्मीरमधील शीख आणि मुस्लिमांचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन केले पाहिजे. त्यावेळी माझे आमदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांना त्या लोकांच्या शरीराचे तुकडे झाडाच्या बुंध्यावरून उचलावे लागले होते. अशी गंभीर परिस्थिती होती" असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.