विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. असं असलं तरी या चित्रपटावरून दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.
"द काश्मीर फाईल्स या चित्रपटात अनेक प्रकारच्या खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. जेव्हा काश्मिरी पंडीत या ठिकाणाहून गेले तेव्हा फारुक अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळ या ठिकाणी राज्यपालांचं शासन होतं आणि देशात भाजपचं समर्थन असलेल्या व्ही.पी. सिंह यांचं सरकार होतं," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आयोजित एका रॅलीदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.