नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केल्यानंतर देशातील भाजप नेत्यांनी या चित्रपटाचे चांगलेच प्रमोशन केले. त्यामुळेच, तब्बल 200 कोटींच्या घरात या चित्रपटाने कमाई केली. मात्र, अनेकांनी चित्रपटाला विरोधही केला. या चित्रपटाप्रमाणेच गुजरात फाईल्स हा चित्रपट काढावा, अशी मागणीही अनेकांनी केली होती. आता, या चित्रपटाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
द काश्मीर फाईल्स चित्रपटाने काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणला आहे. त्यामुळेच, या सिनेमाला दीर्घकाळ लक्षात ठेवले जाईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथील आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतूक केले.
नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा’ (जीकेपीडी) द्वारे ‘द कश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींसह अनुपम खेर, पल्लवी जोशी यांचा सन्मान करण्यात आला. काश्मीर पंडितांचा एक महान आणि समृद्ध असा इतिहास आहे. काश्मीरी पंडितांना त्रास देण्यात आला, त्यांना काश्मीर सोडून बाहेर हाकललण्यात आलं हे सत्य आहे. विवेक अग्निहोत्रींनी काश्मिरी पंडितांचा तो इतिहास चित्रपटातून प्रखरतेने मांडला आहे. हा इतिहास दुसऱ्यांदा जिवंत केल्याबद्दल मी अग्निहोत्री यांचे आभार मानतो, असेही गडकरींनी म्हटले. कट्टरतावाद हा धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही संपवून टाकतो, हेच चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. काश्मिरी पंडितांचा इतिहास लोकांना माहिती नव्हता. सत्य लपविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या चित्रपटातून हे सत्य जगासमोर आल्याचेही गडकरींनी म्हटले.