नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर, आता तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी मोठं विधान केलं आहे.
द काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. तर, पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी उपरोधात्मक टिका केली आहे. ''संसदेत कायदा संमत करुन हा चित्रपट न पाहणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करायला हवी. केवळ संपू्र्ण भारतात हा चित्रपट टॅक्स फ्री करुन चालणार नाही, तर प्रत्येक भारतीयास हा चित्रपट पाहणे बंधनकारक करायला हवं,'' असेही सिन्हा यांनी ट्विट करुन म्हटले.
द काश्मीर फाईल्स बद्दल काय म्हणाले मोदी
देशातील बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये द काश्मीर फाइल्स(The Kashmir Files) सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यातच आता भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही(PM Narendra Modi) या सिनेमावर भाष्य केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.