नवी दिल्ली - भारतामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे देश-विदेशातील लोक फिरायला येतात. अनेक अशाही जागा आहेत, जिथे जायला लोकांना भीती वाटते. या जागांबाबत वेगवेगळ्या कहाण्या ऐकिवात आहेत. असंच एक तलाव हे हरियाणातील फरिदाबाद येथे आहे. या तलावाबाबतची माहिती ऐकल्यावर तुमची भीतीने गाळण उडेल. या तलावाचं नाव आहे खुनी तलाव. फरिदाबादमधील या तलावाला खुनी तलाव म्हणूनही ओळखले जाते. या तलावाला अनेकजण शाप मानतात. या तलावाने अनेक जणांचा जीव घेतला आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.हे खुनी तलाव फरिदाबादमधील सूरजकुंड येथे आहे. हे तलाव म्हणजे सात खाणींचा संग्रह आहे. या खाणी नंतर नैसर्गिक क्रिस्टल वॉटरने भरून गेल्या आहेत. या खाणी खूप खोल आहे आणि येथे पोहण्यावर बंदी आहे. या तलावामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या जातात. आधी येथे जाण्याची परवानगी नव्हती. मात्र आता हे तलाव पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे तलाव भारद्वाज तलाव या नावानेही ओळखले जाते. या तलावामधील पाण्याचा रंग निळा आहे. १९९१ मध्ये खाणकामासाठी हे तलाव खोदण्यात आले होते. त्यानंतर ते एवढे खोल झाले की त्याचे खोदकाम हे भूजलापर्यंत पोहोचले. त्यानंतर या तलावाचे रूपंतर हे नैसर्गिक तलालामध्ये झाले. या तलावमध्ये आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मते हे तलाव दरवर्षी तीन जणांचा बळी घेते. त्यामुळेच या तलावाला खुनी तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावाच्या आसपासचा परिसर सुंदर आहे. दिल्ली एनसीआरमधील रहिवाशांसाठी हे पिकनिक आणि टुरिस्ट प्लेस बनले आहे. हे तलाव अरवली पर्वतात करण्यात आलेल्या अवैध खाणकामामुळे तयार झाले आहे. खाणकामामुळे येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे अपघात होत असतात. ते तलाव खूप खोल आहे. तरीही येथे सुरक्षेसाठी गार्डची तैनाती करण्यात आलेली नाही, तसेच इतर कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. मात्र सावधानतेचा इशारा देणारे अनेक बोर्ड येथे लागलेले आहेत.
खुनी तलाव, दरवर्षी घेते तीन लोकांचा बळी, जायला वाटते भीती, तरीही होते पर्यटकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 5:16 PM