लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावरील माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने ‘एक देश, एक निवडणुकी’बाबत जनतेकडून अभिप्राय मागवला आहे. १५ जानेवारीपर्यंत प्राप्त अभिप्रायांवर विचार केला जाईल. अभिप्राय समितीच्या वेबसाइटवर किंवा ई-मेलद्वारा पाठवला जाऊ शकतो’, असे या उच्चस्तरीय समितीने एका जाहीर सूचनेत म्हटले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. समितीने अलीकडेच राजकीय पक्षांना पत्रे लिहून देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत त्यांचे मत मागवले होते. सहा राष्ट्रीय पक्ष, २२ राज्य पक्ष व इतर सात, अशा ३५ पक्षांना ही पत्रे पाठवण्यात आली होती. समितीने एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत विधि आयोगाचे मतही जाणून घेतले. या मुद्यावर विधि आयोगाला पुन्हा बोलावले जाऊ शकते.
भारतीय राज्यघटना आणि इतर वैधानिक तरतुदींतर्गत विद्यमान प्रणाली लक्षात घेऊन लोकसभा, राज्य विधानसभा, नगरपालिका व पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी शिफारसी करणे आणि तसेच राज्यघटना, लोकप्रतिनिधी कायदा, १९५०, लोकप्रतिनिधी कायदा, १९५१, संबंधित इतर नियम आणि कायद्यांमध्ये एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्तींची शिफारस करणे, हा या समितीचा उद्देश आहे.