नवी दिल्ली : काश्मीरमधील तीव्र कोरड्या आणि थंडीच्या लाटेपासून बुधवारी कोणताही दिलासा मिळाला नाही. मंगळवारी रात्री अनंतनाग हे जम्मू आणि काश्मीरमधील सर्वांत थंड ठिकाण ठरले, कारण पारा गोठणबिंदूपेक्षा सात अंशांपेक्षा खाली गेला होता.श्रीनगर शहरात सलग दुसऱ्या रात्री उणे ४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्यामुळे दल सरोवराच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर तयार झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हाऊसबोटमध्ये राहणाऱ्या तलावातील रहिवाशांना त्यांच्या बोटी किनाऱ्याकडे वळवताना बर्फाचा थर बाजूला सारताना दमछाक करावी लागली. काश्मीरमधील अनेक भागांत थंडीच्या लाटेमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही गोठल्या आहेत. गुलमर्गमध्ये -३.८ अंश, काझीगुंडमध्ये -४.६, कोकेरनागमध्ये उणे ३.२ तापमान नोंदवले गेले.
कुठे थंडी, कुठे पाऊस तर कुठे गारा- मध्य प्रदेश आणि राजस्थानसह उत्तर भारतातील १२ राज्यांमध्ये बुधवारी (३ जानेवारी) दिवसाची सुरुवात दाट धुक्याने झाली. - धुक्यासोबतच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही जोरदार पाऊस झाला. इंदूर, भोपाळ, वाराणसी, लखनौसह १५ शहरांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्येही गारा पडल्या.
पावसाची शक्यता कुठे?अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे लक्षद्वीप, तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचवेळी राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.