उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील किठौर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवलेला नेता चक्क लक्झरी कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य निघाल्याने खळबळ उडाली आहे. कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य असलेल्या या नेत्याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरी केलेल्या पाच गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. हा नेता २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत किठोर विधानसभा मतदारसंघातून आझाद समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढला होता.
आझाद समाज पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या या नेत्याचं नाव मोहम्मद अनस उर्फ हाजी असं आहे. तो लक्झरी गाड्या चोरणाऱ्या टोळीचा सदस्य होता. मोहम्मद अनस याला दिल्लीतील एएटीएसच्या पथकाने अटक केली. अनस हा दिल्लीमधून चोरीच्या आलिशान गाड्या आणून त्या विकत असे. मोहम्मद अनससोबत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी खास अॅपही विकसित केलं होतं. तसेच त्यामाध्यमातूनच ते आपापसात संपर्क साधत असत.
अटक केलेल्या आरोपींनी चौकशीमध्ये ते दिल्लीमधून आलिशान गाड्या चोरल्यानंतर त्या विकण्यासाठी सौदा करत होते, अशी कबुली दिली. त्यांच्यापैकी मोहम्मद अनस हा गाड्या नेण्यासाठी दिल्लीला यायचा. आरोपींनी दोन महिन्यांच्या काळात दिल्लीमधून सुमरे ३० गाड्यांची चोरी केली. मोहम्मद असन दिल्लीत चोरी झालेल्या गाड्या खरेदी करायचा आणि पुढे टोळीचा म्होरक्या गुड्डू याला चांगल्या किमतीला विकायचा, अशी माहितीही समोर आली आहे.