सुमारे १७ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी मुख्य आरोपी असलेल्या तहव्वूर राणा याला अखेर भारतात आणण्यात यश आलं आहे. अमेरिकेकडून प्रत्यार्पण झाल्यानंतर राणा याला विमानामधून घेऊन निघालेलं भारतीय तपास यंत्रणांचं पथक त्याच्यासह दिल्लीतील विमानतळावर दाखल झालं आहे. मात्र मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला ज्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात आली त्याप्रमाणे तहव्वूर राणा याला मात्र आरोप सिद्ध झाले तरी फाशीच्या तख्तापर्यंत नेता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे भारताला या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पण कराराचं पालन करावं लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणा याला खटल्यात दोषी ठरल्यानंतर फाशीची शिक्षा देता येणार नाही. तसेच त्याच्याविरोधात कुठला नवा खटलाही दाखल करता येणार नाही. भारतीय यंत्रणांनी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणावेळी अमेरिकेच्या न्याायलयात जे खटले लिहून दिले आहेत, तेच खटले आता राणा याच्याविरोधात चालवता येणार आहेत. तहव्वूर राणा याच्याविरोधात अनेक खटले दाखल असले तरी अमेरिकेच्या न्यायालयात माहिती दिलेल्या खटल्यावरूनच राणाविरोधात न्यायालयीन प्रक्रिया करता येणार आहे.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, या प्रकरणी अमेरिकेच्या कोर्टान माहिती न दिलेलं कुठलंही नवं कलम तहव्वूर राणाविरोधात दाखल करता येणार नाही. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, नियमानुसार ज्या खटल्याला म्हणजेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आधार बनवून राणा यााला भारतात आणण्यात आलं आहे. त्यानुसार त्याच्याविरोधात केवळ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचाच खटला चालणार आहे. तहव्वूर राणा याने इतर गुन्हे कबूल केले तरी त्याच्याविरोधात अन्य कुठलाही खटला दाखल होऊ शकणार नाही.
दरम्यान, तहव्वूर राणा याला या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलाही जामीन मिळणार नाही. तसेच त्याला तुरुंगातून पॅरोलही दिली जाणार नाही. संपूर्ण सुनावणीदरम्यान, त्याला तुरुंगातच राहावं लागेल. तसेच भारतातील न्यायालयं जी शिक्षा देतील ती पूर्ण करावी लागेल. मात्र त्यामध्ये फाशीच्या शिक्षेचा अंतर्भाव नसेल.