जिवंत महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले, पोस्टमार्टमसाठी पाठवले, तेवढ्या पतीने हात पकडला आणि ती महिला झाली जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 03:29 PM2022-02-26T15:29:20+5:302022-02-26T15:30:52+5:30
Hospital News: ग्वाल्हेर चंबळ भागातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या जयारोग्य चिकित्सालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
ग्वाल्हेर - ग्वाल्हेर चंबळ भागातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या जयारोग्य चिकित्सालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे गंभीर अवस्थेत उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठीही पाठवण्यात आला. मात्र पोस्टमार्टेमला नेण्यापूर्वी पतीने सदर महिलेचा हात पकडला आणि तिच्या नाडीचा अंदाज घेतला तर ती जिवंत असल्याचे दिसून आले.
त्यानंतर रुग्णालयात खळबळ उडाली. महिलेला पुन्हा एकदा ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर पुन्हा एकदा उपचार सुरू करण्यात आले. हलगर्जीपणाचा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आरकेएस धाकड यांनी कारवाईसाठी कठोर पावले उचलत तपास समिती स्थापन केली. तसेच आरोपी डॉक्टरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
उत्तर प्रदेशमधील महोबा येथील जामवती या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना नातवाईकांनी झांसीमधील एका खासगी रुग्णालयात आणले. तिथून तयांना उपचारांसाठी जयारोग्य रुग्णालयात पाठवले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुठल्याही रुग्णाला मृत घोषित करण्यापूर्वी ईसीजी काढणे आवश्यक असते. मात्र ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित करून थेट पोस्टमार्टमसाठी पाठवले.
पोस्टमार्टेम हाऊसचे गेट उघडण्याची वाट पाहत असलेल्या पतीने पत्नीचा अखेरच्या वेळी हात पकडला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याच्या पत्नीची नाडी सुरू होती. त्यानंतर रुग्णालयात धावाधाव झाली. तसेच महिलेला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले.