पाटणा पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन गेम्सची चटक लागलेल्या एका टोळीच्या पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटणा येथील तीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन गेम्सची चटक लागली होती. ऑनलाइन गेम खेळता खेळता ते कर्जाच्या ओझ्याखाली एवढे बुडाले की, त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी जो मार्ग निवडला, त्याबाबतचा उलगडा केल्यावर पोलीसही अवाक् झाले. ऑनलाइन गेम खेळून झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली.
पाटणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जबाजारी झाल्यानंतर या विद्यार्थ्यांकडे पैसे परत करण्यासाठी कर्ज देणाऱ्यांनी तगादा लावला. त्यानंतर कर्जफेड करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली. हे तिघेही हॉस्टेलच्या बहाण्याने गल्ली बोळात फिरून सावज हेरू लागले. तसेच जे विद्यार्थी त्यांच्या खोलीत नसायचे, त्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तू चोरून न्यायचे. त्यानंतर हा चोरीचा माल मिळेल त्या किमतीला विकून टाकायचे. आरोपी हे मुळचे शेखुपूरा येथे राहणारे आहेत. तसेच एकमेकांचे मित्र आहेत.
या विद्यार्थ्यांविरोधात बुद्ध कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या चोरांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. चोरीचा माल हे विद्यार्थी दुकानदारांना विकायचे. तसेच दुकानदार या चोरीच्या वस्तू बनावट बिल तयार करून ऑनलाइन विकून टाकायचे. चौरांच्या चौकशीमधून काही दुकानदारांची नावंही समोर आली आहेत. आता पोलीस त्यांची पुढील चौकशी करत आहेत.
दरम्यान, पाटणा पोलिसांनी आता सर्वसामान्य जनतेला ऑनलाइन सेकंड हँड सामान खरेदी करण्यापूर्वी त्याची व्यवस्थित पडताळणी आणि माहिती घेतल्यानंतरच खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या पाटणा पोलिसांनी चोरांच्या टोळीमधील सदस्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांना याबाबतची माहिती दिली आहे.