साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon) यांची मुख्य भूमिका असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट २०२३ चा बहुप्रतीक्षित चित्रपट होता. रामायणावर आधारित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर 'आदिपुरुष' १६ जूनला थिएटरमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने रेकॉर्डही तोडले. एका दमदार सुरुवातीच्या वीकेंडनंतर, चित्रपट त्याच्या खराब संवाद, व्हीएफएक्स आणि पात्रांमुळे वादात सापडला. संतप्त लोकांनी हा चित्रपट पूर्णपणे नाकारला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही झाली. या चित्रपटाविरुद्ध अनेकजण न्यायालयातही गेले. मंगळवारी यासंदर्भाती एका याचिकेवर सुनावणी करताना इलाहाबाद उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारलं. तर, संवाद लेखक मनोज मुंतशिर यांना पार्टी बनवून नोटीसही जारी केली.
रिलीज झाल्यापासून 'आदिपुरुष' वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. वाढता वाद पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचे संवाद बदलले, थ्रीडी तिकिटांच्या किमतीही कमी केल्या, असे असतानाही 'आदिपुरुष'ला थंड प्रतिसाद मिळतो आहे. आता, दिवसेंदिवस त्याच्या कमाईत मोठी घसरणही होत आहे. याप्रकरणी हायकोर्टात दाखल एका याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, संवाद लेखकास नोटीसही बजावण्यात आली, तसेच मनोज मुंतशीर यांनी हिंदूंच्या भावनांशी खेळ का केला, याचे उत्तरही न्यायालयाने मागितले आहे.
हायकोर्ट सोशल एक्टिव्हीस्ट कुलदीप तिवारी आणि वंदना कुमार यांच्यातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये, न्या. राजेश सिंह चौहान आणि न्या. प्रकाश सिंह यांनी कडक शब्दात चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि संवाद लेखकास सुनावले. हिंदू सहिष्णू आहे तर मग तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळणार का, असा सवालही न्यायालयाने विचारला. जर एखादा चांगला असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करणार का? असा सवालही हायकोर्टाने विचारला आहे.
चांगली गोष्ट ही आहे की, हा एका अशा धर्माचं प्रकरण आहे, ज्या धर्माचे लोक तोडफोड करत नाहीत. आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं की काही लोकांनी चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृह बंद केले. मात्र, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे कुठलेही काम केले नाही. मग, तुम्ही त्यांच्या सहनशीलतेची परिक्षा घेणार का? असा सवाल हायकोर्टाने विचारला. या चित्रपटातून गंभीर मुद्दे उचलण्यात आले आहेत, असेही न्यायालयाने म्हटले.
या चित्रपटात असे पात्र आहेत, ज्यांची लोक पूजा करतात. लोक घरातून बाहेर पडण्यापूर्वी रामचरितमानस वाचतात. चित्रपट बनवणाऱ्यांनी राम-सिता आणि हनुमान यांची टिंगल बनवून ठेवलीय. सर्वकाही रामायणातूनच घेतलंय आणि चित्रपटाचे निर्माते म्हणतात की हे रामायण नाही, अशा शब्दात न्यायाधीशांनी निर्मात्यांना आणि संवादलेखकांना खडसावले. तुम्ही देशात राहणाऱ्यांना मूर्ख किंवा वेडा समजता का, असा सवालही न्यायालयाने निर्मात्यांना केला आहे.